भारत आयात शुल्क आकारणार नाही   

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

दोहा : अमेरिकेच्या वस्तूंवर कोणतेही आयात शुल्क आकारणार नसल्याचा निर्णय भारताने घेतला आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केला.दोहा येथे उद्योगविषयक गोलमेज परिषदेत ते म्हणाले, भारताने अमेरिकेच्या वस्तूंवर कोणतेही आयात शुल्क आकारणार नाही, असा प्रस्ताव अमेरिकेला दिला आहे. ते म्हणाले, अ‍ॅपल कंपनीला भारतात आयफोन न बनवण्याचे आवाहन मी केले आहे. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना  तसे सांगितले. भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या. अ‍ॅपल भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखत असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.ट्रम्प म्हणाले, मी काल टिम कुक यांच्याशी बोललो. मी त्यांना सांगितले, की टिम, आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतोय.   
 
तुम्ही ५०० अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात, पण आता मी ऐकत आहे, की तुम्ही भारतातही कारखाने बांधत आहात. मला असे वाटते, की भारतात कारखाने उभारावे. जर तुम्हाला भारताला मदत करायची असेल तर ते ठीक आहे, पण भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणार्‍या देशांपैकी एक आहे. तिथे विक्री करणे कठीण आहे. भारताने आम्हाला एक प्रस्ताव दिला आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या वस्तूंवर कोणताही कर लादणार नाही असे आश्वासन दिले आहे.

आम्ही वर्षानुवर्षे सहन केले

ट्रम्प पुढे म्हणाले, तुम्ही आधी चीनमध्ये कारखाने बांधले आहेत, ते आम्ही वर्षानुवर्षे सहन केले. आता आम्हाला तुम्ही भारतात कारखाने बांधावेत असे वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते खूप चांगले काम करत आहेत. आम्हाला तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारावेत असे वाटते. ट्रम्प यांच्या मते, अ‍ॅपल आता अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह उत्पादन वाढवेल.

‘मेक इन इंडिया’ आव्हान

डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचे प्रतिबिंब आहे. अ‍ॅपल सारख्या मोठ्या ब्रँडनी अमेरिकेत गुंतवणूक करावी असे त्यांना वाटत आहे, जेणेकरून अमेरिकत नोकर्‍या वाढतील. भारतात, अ‍ॅपल आधीच फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या सहकार्याने आयफोनचे उत्पादन करत आहे. २०२५ मध्ये भारतात बनवले जाणारे १५ टक्के आयफोन अमेरिकेत निर्यात केले जातील. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आव्हान ठरू शकते.

 

Related Articles